‘भांडण झालं दिरासोबत अन् नवर्‍याला सोडलं’, सुप्रिया सुळेंकडून हर्षवर्धन पाटलांचा ‘समाचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जागावाटपाविषयी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या मतभेदांमुळे काँग्रेसचे नेते आणि हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावर भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं असं हर्षवर्धन पाटील यांचं झालंय, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. तसेच कोणतीही चर्चा केल्याशिवाय पक्ष कसा काय सोडला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपप्रवेशाविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘भांडण झाल दिराशी आणि नवऱ्याला सोडून चाललेत. तुमची नाराजी राष्ट्रवादीशी आहे काँग्रेसने तुम्हाला काय केलयं ? काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये इंदापूरच्या जागेची चर्चा झालेलीच नाही. सीट बदलून हवी होती तर जागावाटपाविषयी चर्चा तर करायला पाहिजे होती. काँग्रेसकडून प्रस्ताव आला असता तर त्यावर चर्चा केली असती. चर्चा झाल्याशिवाय त्यांनी निर्णय घेतलाच कसा? याच मला आश्चर्य वाटतंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी नाही कधी म्हणला आहे. ‘

या कारणामुळे हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश
इंदापूर मतदारसंघात आघाडीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केली होती.

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर आज त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी 3 वेळा अपक्ष म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात त्यांनी 5 वर्ष आणि त्यानंतर आघाडी शासनात 14 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.