Loksabha : प्रतिस्पर्धी कांचन कुल यांच्याबाबत सुप्रिया सूळे म्हणतात…

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकीत बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या लढतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘ कांचन कुल यांची उमेदवारी हा भावनिक विषय नाही. निवडणूक लढणं हे जबाबदारीचं काम आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर २२ लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणं हे महत्वाचं असतं,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘पवारांना खुर्ची पाहिजे’ असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला त्या म्हणाल्या ” ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात एकही इलेक्शन लढली नाही, त्यांनी वडिलांच्या वयाच्या माणसाने जे कर्तृत्व केले त्यांचे कर्तृत्व केवळ राज्याने नाही तर देशाने पाहिलय याच्याबद्दल महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात किती बोलणं योग्य आहे? हाच प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामती लोकसभेसाठी भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी

बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे रात्री उशिरा त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. कांचन कुल यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली असल्याने कुल गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे या विजयी झाल्या होत्या. परंतु, त्यावेळी त्यांचे मताधिक्य घटले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यावेळी कपबशीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना दौंड, पुरंदर व खडकवासला या मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी सुळे यांना बारामती, इंदापूर व भोर मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाल्याने त्या विजयी झाल्या होत्या. कांचन कुल यांच्या उमेदवारीने कुल गटामध्ये आनंदाचे वातावरण असून भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने येथे काटे की टक्कर पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.