मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक : खा. सुप्रिया सुळे

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सक्रिय आहे असे आम्ही ऐकत आहोत. मागच्या सरकारनेही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला; मात्र सरकारची एकूण वाटचाल पाहता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधी फसवणूक करत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खा. सुप्रिया सुळे खासगी कार्यक्रमनिमित्त कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधी निर्णय घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २०८ बैठका झाल्या; पण आरक्षणावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे सरकार जनतेची फसवणूक करत आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारमधीलच मंत्री आणि आमदार वेगवेगळी विधाने जाहीर करत आहेत. शासनही वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सेल्फी काढण्यासाठी महाराष्ट्रातील रस्त्यावर एकही खड्डा आता राहणार नाही, या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत बोलताना नामदार पाटील यांचे हे विधान खरे ठरले तर तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल; पण चार वर्षांत रस्ते दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊन हे काम चांगले का होत नाही, असा मला पडलेला प्रश्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्या म्हणाल्या, राज्यातील दुष्काळप्रश्नी भाजप सरकार असंवेदनशील आहे. मराठवाडा, विदर्भच नव्हे, तर बारामतीसारख्या मतदारसंघातील अनेक तालुक्यांत पाण्याचा थेंब पडलेला नाही; मात्र सरकारकडे याबाबत कुठलेही नियोजन नाही. केवळ निधी मागून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी दुष्काळाशी सामना करण्याबाबतचा आराखडा तयार पाहिजे; पण असा कुठलाही आराखडा सरकारकडे नाही.