Exit Poll 2019 : मंत्री चंद्रकांत पाटलांची ‘मेहनत’ वाया जाणार ? ; सुप्रिया सुळे किमान 40 हजार मतांनी निवडुन येणार !

ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून – केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे अवध्या चार दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र, निवडणुक निकालांपुर्वी बारामती लोकसभा मतदार संघातील बहुसंख्य गावामध्ये सुप्रिया सुळे या किमान 40 हजार मतांनी निवडुन येतील अशी चर्चा रंगली आहे. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मेहनत वाया जाणार असल्याची देखील चर्चा मतदार संघात सर्वत्र आहे. किमान 40 हजार आणि जास्तीत जास्त एक लाख मतांनी सुप्रिया सुळे विजयी होवु शकतात अशी माहिती ठिकठिकाणच्या बातमीदारांनी दिलेली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांचा परभाव होणार या केवळ पारावरच्या गप्पा असून त्यामध्ये तथ्य नसल्याचे ठिकठिकाणच्या बातमीदारांनी पोलीसनामा ऑनलाइनला कळविले आहे. पराभवाच्या त्या पारवरच्या गप्पा ठरतात की आणखी काय होतयं हे दि. 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्‍ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने स्थानिक उमेदवार उतरविला. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली. भाजपचे अनेक मंत्री बारामती मतदार संघात तळ ठोकुन होते. मोठ-मोठे वक्‍तव्य करून त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना परेशान केले. मात्र, कामावर विश्‍वास ठेवणार्‍या आणि प्रचंड मेहनत घेणार्‍या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टाईलने प्रचार चालु ठेवला. गावा-गावात जावुन प्रचार केला. वृध्द, ज्येष्ठ, तरूण मतदारांची भेटी घेत केलेल्या कामाबद्दल सांगितले. सुळे यांना काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांची देखील सांगलीच साथ भेटली. दौंड आणि खडकवासला मतदार संघ वगळता सर्वत्र त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. दौंडमध्ये आमदार राहुल कुल यांचे प्राबल्य असल्याने तेथुन राष्ट्रवादीला मतदान कमी झाले असावे मात्र इतर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीला भरघोस मतदान झाल्याचे ठिकठिकाणचे बातमीदार कळवत आहेत.

बारामती लोकसभा मतदार संघात केलेल्या कामाचा निश्‍चत सुप्रिया सुळे यांना फायदा होणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मंत्री असलेले विजय शिवतरे यांनी भाजप उमेदवार कांचन कुल यांना निवडुन आणण्यासाठी आकाश-पाताळ एक केले. त्यांच्या विधानसभा मतदार संघात देखील कुल यांचा जोरदार प्रचार केला. मतदानाची तारीख जवळ येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत जाहिर सभा होणार असल्याचे सांगण्यात आले. बारामतीमध्ये मोदींची सभा घ्यावी अथवा नाही यावर भाजप श्रेष्ठींमध्ये खलबत झाली. मोदींनी बारामतीमध्ये जाहिर सभा घेतली आणि निकाल काहीसा वेगळा लागला तर. अशा अनेक शक्यतांवर विचार-विनीमय झाला आणि मोदींची बारामती येथील सभा रद्द झाल्याचे कळविण्यात आले. मोदींची बारामतीपासुन जवळच असलेल्या माढा लोकसभा मतदार संघात जाहिर सभा घेण्यात आली. सभेला बारामतीहून हजारो कार्यकर्ते माढयात गेले. मोदींनी देखील माढयाच्या सभेत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर देखील सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा वेग कायम ठेवला. बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले. तेव्हापासुन चर्चेला सुरवात झाली. बारामतीत तळ ठोकुन बसणार्‍या मंत्री चंद्रकांत पाटील यांची मेहनत कामाला येणार की सुप्रिया सुळे यांना नशिब साथ देणार यावर गावो-गावी चर्चा रंगल्या. ठिकठिकाणच्या बातमीदारांनी कळविल्याप्रमाणे बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे या किमान 40 हजार मतांनी तर अधिकाधिक एक लाख मतांनी निवडून येतील.