सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक

दौंड : ( अब्बास शेख )पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित झाल्यानंतर दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दौंड तालुक्यातील विविध गावांतील चौकाचौकामध्ये फटाके फोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोष साजरा केला तर भाजपच्या उमेदवार कांचन कुल या दौंड तालुक्यातील असूनही त्यांना दौंडमधून कमी मताधिक्य मिळाल्याने भाजपवर चिंतनाची वेळ आली आहे. सुप्रिया सुळेंनी जवळपास दीड लाख मतांची आघाडी घेत आपल्या हॅट्रिकवर शिक्का मोर्तब केला.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपीट मतांची मोजणी झाल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली. बारामती मतदारसंघात त्यांना भाजपच्या कांचन कुल यांनी आव्हान दिलं होतं.

सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यावर आघाडी घेत दुपारपर्यंत विजय निश्चित केला. बारामती जिंकण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली होती. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी बारामतीत तळ ठोकून होते.

भाजपने आपल्या दिग्गज नेत्यांची मोठी फौज बारामतीत पाठवल्यामुळे बारामतीच्या विजयाकडे राज्याच्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. बारामती हा पवार कुटुंबींयांचा बालेकिल्ला मानला जातो. या किल्ल्याला भेदण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती.

हा किल्ला सर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत आदी नेत्यांच्या सभाही या मतदारसंघात घेण्यात आल्या. यावेळी पवार कुटुंबीयांना या सर्व दिग्गजांनी लक्ष्य केलं होतं. आपल्या स्वकर्तृत्वावर सुळेंनी मात करत हि विजयश्री खेचून आणली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.