‘कोरोना’ लसीकरणाबाबत खा. सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केली ‘ही’ मोठी मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  महाराष्ट्र राज्यात कोरोनाविरोधातील लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईमधून कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानाला औपचारिक सुरुवात झाली होती. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील कोरोनाकाळातील परिस्थिती कुशलपणे हाताळल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन केलंय. तसेच या पत्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत एक महत्त्वाची मागणी केलीय.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सुप्रिया सुळे म्हणतात, कोरोनाने धुमाकूळ घातल्याने देशाच्या आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला. अशा परिस्थितीत तुमच्या नेतृत्वाखाली राज्याच्या आरोग्य यंत्रणेने उल्लेखनीय काम करून देशासमोर आदर्श निर्माण केलाय. त्यासाठी तुमचे, मंत्रिमंडळाचे अभिनंदन.

दरम्यान, या पत्रामधून सुप्रिया सुळे यांनी कोरोना लसीकरणात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता कोरोनावरील लस उपलब्ध झालीय. त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की, लशीकरणाला सुरुवात करताना ती गरजू घटकांपर्यंत पोहोचावी. यासाठी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.