सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट ! ‘डीअर राजीव, वुई विल मिस यू…, एक तरुण नेता गमावला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे तरुण खासदार राजीव सातव यांचे आज (रविवार) पहाटे पाच वाजता पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. फुफ्फुसातील संसर्ग वाढत गेल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांना धक्का बसला. काहींनी धक्कादायक म्हणत आश्चर्य व्यक्त केले. तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राजीव सातव यांच्या सोबतचा एक व्हिडीओ ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे भावूक झाल्या. काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दु:खद बातमी आहे. त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच शिवाय ते माणुसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसोबत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हणत त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी राजीव सातव यांच्यासोबतचा एक जूना व्हिडीओ शेअर केला आहे. डिअर राजीव, वुई विल मिस यू… असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.