कलेक्टर साहेबांची मग्रुरी…रस्त्यावर आपटून फोडला तरूणाचा मोबाइल, थोबाडीतही मारली (Video)

सूरजपुर : वृत्तसंस्था – छत्तीसगढमधील सूरजपुर जिल्ह्याचे कलेक्टर रणबीर शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कलेक्टर एका तरूणाचा मोबाइल आपटून फोडताना आणि त्यास मारहाण करताना दिसत आहेत. जेव्हा स्वत: मारहाण करूनही त्यांचे मन न भरल्याने त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांना बोलावून मारण्यास सांगितले. सोशल मीडियावर या मारकुट्या आणि मग्रुर कलेक्टरवर जोरदार टीका होत आहे. ज्यानंतर कलेक्टरने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत आपला व्हिडिओ जारी केला आहे.

महिलांसोबत सुद्धा आक्षपार्ह वर्तन
घटना सूरजपुरच्या भैयाथान चौकातील आहे. या जिल्ह्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी शनिवारी म्हणजे काल 22 मेरोजी स्वत: कलेक्टर रणबीर शर्मा रस्त्यावर उतरले. ते लोकांना लॉकडाऊन धडा शिकवता-शिकवता स्वत: मात्र माणुसकीचा धडा विसरून गेले आणि दादागिरी करू लागले. या दरम्यान ते महिलांसोबत सुद्धा आक्षपार्ह वर्तन करतान दिसले. काही लोकांना खुलेआम उठबशा काढायला लावल्या. अल्पवयीन मुलगा जो आपल्या वडीलांसोबत औषधे आणण्यासाठी गेला होता त्यालाही काठ्यांनी मारहाण केली, औषधांची प्रिस्किप्शन दाखवूनही मारहाण करण्यात आली.

मारहाणीत अल्पवयीनासह अनेक जखमी
कलेक्टरचा उन्मत्तपणा इतका उफाळून आला होता की, त्याने एका तरूणाचा मोबाइल खुलेआम रस्त्यावर आपटून फोडला आणि पोलीस कर्मचार्‍यांना त्यास मारहाण करण्यास सांगितली आणि स्वत:ही मारहाण केली. या दरम्यान त्यांची मगु्ररी इतकी वाढली होती की, रस्त्यावर सबळ कारणासह आलेल्या लोकांनाही ते सोडत नव्हते. कलेक्टरच्या या कारवाईत एका 13 वर्षांचा मुलासह अनेक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्पष्टीकरण देत माफी मागितली
ही घटना सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर कलेक्टर रणबीर शर्मा ट्विटरवर जोरदार ट्रोल होत आहेत. सोशल मीडियामध्ये त्यांना हटवण्याचा हॅशटॅग सुरूआहे. ज्यानंतर स्वत: रणवीर शर्माने सोशल मीडियावर आपला व्हिडिओ जारी करून संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत माफी मागितली. केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे म्हटले आहे.

रणबीर शर्मा यांची हकालपट्टी
सीएम बघेल यांनी ट्विटरद्वारे म्हटले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरजपुर कलेक्टर रणबीर शर्मा यांनी एका अल्पवयीन मुलासह तरूणाशी गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. हे अतिशय दुख:द आणि निंदणीय आहे. छत्तीसगढमध्ये अशाप्रकारचे कृत्य सहन केले जाणार नाही. कलेक्टर रणबीर शर्मा यांना तात्काळ प्रभावातून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही अधिकार्‍याचे शासकीय जीवनात अशाप्रकारचे वर्तन स्वीकारार्ह नाही. दरम्यान, आयएएस असोसिएशनने सुद्धा रणबीर शर्माच्या वर्तणुकीवर टीका केली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, त्यांची वर्तणूक मूलभूत शिष्टचाराच्या विरूद्ध आहे.