सुरेखा पवार यांना गुरू-शिष्य पुरस्कार बबन माने यांचाही होणार गौरव 

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईन- रेखासम्राट टी. के. वडणगेकर, पत्रकार व्यंकटेश चपळगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे गुरू-शिष्य पुरस्कार आज जाहीर झाले. “सकाळ’च्या “स्मार्ट सोबती’ पुरवणीच्या संपादक सुरेखा पवार, चित्रकार बबन माने यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शुक्रवारी (ता.15) सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कारांचे वितरण होईल.
सुरेखा पवार गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेत असून कोल्हापूर आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांसाठीही त्यांनी लेखन व सादरीकरण केले आहे. “सकाळ’मध्ये सुरवातीला त्यांनी “लक्षवेधी’ पुरवणी सुरू केली. त्यानंतर “स्मार्ट सोबती’ या साप्ताहिक पुरवणीच्या संपादक म्हणून त्या गेली पंधरा वर्षे कार्यरत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील वाचकांचा या पुरवणीला आजवर उदंड प्रतिसाद मिळाला आहे. “सई’ या टोपण नावाने पाच वर्षे त्यांचे सुरू असलेले “हाय फ्रेंडस्‌’ हे सदरही वाचकप्रिय आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या ललित कला विभागात बबन माने कार्यरत असून जी.डी. आर्ट (कमर्शियल) पूर्ण केल्यानंतर ऍनिमेशन क्षेत्रात त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर ते कलाशिक्षक म्हणून रूजू झाले. विविध माध्यमातील वास्तवदर्शी कलाकृती ही त्यांची खासियत आहे. देशभरात अनेक ठिकाणी त्यांची चित्र प्रात्यक्षिके आणि प्रदर्शने झाली आहेत. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार के.आर. कुंभार, विलास बकरे, विजय टिपुगडे यांनी केले आहे.

परिचय
-नावः सौ. सुरेखा श्रीराम पवार, पुरवणी संपादक, दै. सकाळ.
-जन्मः 22 जून 1973, कोल्हापूर

-शिक्षणः बी.एस्सी. (रसायनशास्त्र), एम.ए. (मराठी), बी.जे.सी.
-प्राविण्यः शालेय, महाविद्यालयीन जीवनात कथा-काव्य-निबंध लेखन,
वक्तृत्व, एकांकिका यांमधे यश.

-विशेषः सांगली, कोल्हापूर आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांसाठी लेखन व निवेदन, जिंगल्स साठी आवाज

-वृत्तपत्रिय अनुभवः एकुण 24 वर्षे.
-सुरुवात-1993-दै. पुढारी-अनुवादक म्हणून.
त्यानंतर उप-संपादकपदाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळतानाच लोकआवडीच्या विविध
विषयांवर प्रासंगिक लेखन.

-दै. पुढारीच्या उन्हाळी सुट्ट्यांतील “मुलांचे पान’, दैनंदिन “विश्‍वसंचार’ तसेच महिलाविषयक “कस्तुरी’ आदी पुरवण्या सुरु करण्यात पुढाकार व योगदान.

-2003 अखेरीस दै. सकाळ मधे रूजू.
-“लक्षवेधी’ ही दैनंदिन पुरवणी सुरु.

-जानेवारी 2004 मधे तत्कालिन व्यवस्थापकांच्या प्रोत्साहनाने “स्मार्ट सोबती’ ही साप्ताहिक पुरवणी सुरु.
संकल्पना, संकलन, संयोजन, संपादन अशा बहुतेक सर्वच आघाड्या एकहाती सांभाळणाऱ्या या पुरवणीचे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा सर्वच ठिकाणच्या वाचकांनी पहिल्या अंकापासून आजतागायत उत्स्फूर्त स्वागत करून उदंड प्रेम दिले आहे. दै. सकाळची ही या भागातील सर्वाधिक लोकप्रिय पुरवणी.

-अन्य प्रासंगिक लेखनाशिवाय “स्मार्ट सोबती’ या पुरवणीतील “सई’ या टोपण नावाने लिहित असलेले
“हाय फ्रेंडस्‌!’ हे सदर अत्यंत लोकप्रिय. सर्वच वयोगटातील वाचकांकडून त्याला उत्कट व उदंड प्रतिसाद.

-“मुक्तपीठ’ या साप्ताहिक पुरवणीच्या माध्यमातून जनसामान्यांना लिहिते करुन विविध सामाजिक प्रश्‍नांवर-भावनिक मुद्यांवर विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयास.