सुरेश जगताप यांना ‘तो’ पर्यंत पदोन्नती देऊ नये, सामाजिक संघटनांची राज्य शासनाकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   घनकचरा विभागाच्या निविदांची चुकीच्या पद्धतीने छाननी करून महापालिकेला १० ते १२ कोटी रुपयांचा भुर्दंड देण्यास कारणीभूत ठरलेले सह आयुक्त सुरेश जगताप यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती देउ नये, अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी राज्य शासनाकडे केली आहे.

सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार, नागरिक चेतना मंचचे मेजर जनरल सुधीर जटार, कनिज सुखरानी, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. राज्य शासनाने पालिकेतील सह आयुक्त सुरेश जगताप यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती दिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे. चोवीस तासात खतनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाच्या निविदांची चुकीच्या पद्धतीने छाननी झाल्याचे नागरिक चेतना मंचने प्रतिस्पर्धी आयोगाकडे केलेल्या तक्रारीत निष्पन्न झाले होते. याप्रकरणी संबधित कंत्राटदारांना ३ कोटी रुपये दंडही ठोठावला होता. तर या निविदांची चुकीच्या पद्धतीने छाननी केल्याचा ठपका जगताप यांच्यावर ठेवला होता. याप्रकरणी जगताप यांची चौकशी व्हायची आहे. ते निर्दोष ठरेपर्यंत त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती देउ नये अशी मागणी या संघटनांनी मुख्यमंत्री आणि संबधित विभागांच्या सचिवांकडे केल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.