काँग्रेसचा मोदी सरकारवर ‘सर्जिकल स्ट्राइक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अडीच वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व करुन मोदी सरकारच्या लष्करी कारवाईत मानाचा शिरपेच रोवणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा गुरुवारी काँग्रेसमध्ये सामील झाले. हुडा यांना काँग्रेसमध्ये सामील करुन घेऊन पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यावरून आक्रमक झालेल्या मोदी सरकारवर गुरुवारी काँग्रेसने राजकीय ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला.

लेफ्टनंट जनरल हुडा यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षेवर दृष्टीकोनपत्र तयार करण्यासाठी तज्ञांच्या कृतीदलाची स्थापना करण्यात येत असल्याचे जाहीर करून मोदी सरकारला अनपेक्षित धक्का दिला.

दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी तळावर अडीच वर्षापूर्वी हल्ला केला होता. त्याला प्रतिउत्तर देताना भारताकडून २९ सप्टेंबर २०१६ च्या पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. या सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी केले होते. या सर्जिकल स्ट्राईकचा मोदी सरकारने प्रचंड गाजावाजा केला होता.

सर्जिकल स्ट्राइकचे हिरो हुडा यांनी गुरुवारी राहुल गांधींची भेट घेतली आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील काँग्रेसने स्थापन केलेल्या कृती दलाचे अध्यक्षपद स्वीकारले. माजी लष्करी अधिकारी, सैनिक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाला राहुल गांधी अतिशय महत्त्व देत आहेत. वन रँक, वन पेंशनसाठी अजूनही जंतरमंतर येथे संघर्ष करीत असलेले मेजर जनरल सतबीर सिंह यांच्या मते यापूर्वीही सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. २०१४ साली आपण मोदींवर विश्वास ठेवला, पण आता तो विश्वास संपलेला आहे, असे अनेक माजी लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुलवामाच्या १४ फेब्रुवारीच्या घटनेनंतर लेफ्ट. जनरल हुडा यांनी भारताला सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुलवामाच्या हल्ल्याचे आश्चर्य वाटले नाही, असे मत लेफ्ट. जनरल हुडा यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर आत्मचिंतन आणि सखोल विचाराअंती सर्व मुद्द्यांवर फेरविचार करण्याची वेळ आली असल्याचे हुडा यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात भाजपच्या ज्वलंत राष्ट्रभक्तीच्या मुद्द्याला निष्प्रभ करण्यासाठी लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा यांचा प्रतिवाद काँग्रेससाठी उपयुक्त ठरणार आहे. भाजपसाठी हा मोठाच झटका मानला जात आहे.