डाॅ. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक : देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सुजय विखे यांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करून काँग्रेस हालवून टाकली आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. मोदींची मागची सभा याच मैदानावर झाली होती, त्यावेळी नगर आणि शिर्डीची जागा जिंकली होती, यावेळीही तेच होणार, दोन्ही जागा प्रचंड मतांनी जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कधी कधी निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो तो आपण सुजय विखेंच्या माध्यमातून केला आणि पुरी काँग्रेस हालवून टाकली. ‘ या देशाला विकासाकडे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच नेऊ शकतात. राष्ट्रीयता काय असते, सुरक्षा काय असते, हे दाखवून देणाऱ्या मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कुकडी, निळवंडे येथील प्रकल्पांचे काम मार्गी लावले. त्यासाठी निधी देऊन या प्रकल्पांचे काम सुरु केले आहे. त्यामुळे काही दिवसातच हा भाग सुजलाम सुफलाम होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा झाली. सभेला पंतप्रधान मोदींसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, पालकमंत्री राम शिंदे, उपनेते अनिल राठोड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजप आमदार व महायुतीचे जिल्हाध्यक्ष व उमेदवार उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश केवळ अफवाच –

नगर दक्षिणमधून सुजय विखेंना आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत. सुजय विखेंनी तर भाजपमध्ये प्रवेश करुन, नगर दक्षिणमधून तिकीटही मिळवलं. मुलगा सुजय विखेच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे आज भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित मानलं जात होतंच. मात्र आजच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. त्यामुळे ही चर्चा केवळ अफवाच ठरली आहे.