‘त्या’मुळे निवडणूक तारखेबद्दल निश्चित सांगता येणार नाही : निवडणूक आयुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – लोकसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या निवडणूक आयुक्तांनी निवडणुकी बाबत मोठे भाकीत केले आहे. भारतात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निवडणुकीच्या तारखांबद्दल निश्चित सांगता येणार नाही. तसेच निवडणूक आयोग काश्मिरमध्ये सीमेवर होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे असे देखील निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी म्हणले आहे.

भारत पाकिस्तान संबंधामध्ये तणावजन्य परिस्थिती आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून काल मंगळवारी पहाटे भारतीय वायूसेने पाकिस्तानच्या हद्दीत दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला केला. त्यात ३५० दहशवादी ठार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारला असता त्यांनी निवडणूक तारखांबद्दल  निश्चित सांगता येणार नाही असे म्हणले आहे.

दरम्यान निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तयारीची पाहणी केली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात हि माहिती निवडणूक आयुक्तांनी माध्यमांना दिली आहे. आपण कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मत टाकले हे पाहण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन द्वारे मतदारांना पावती दिसणार आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या निवडणूक आयुक्तांनी येथील निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन निवडणूक तयारीची माहिती घेतली आहे.