‘त्या’ पोलिस निरीक्षकाची अखेर शरणागती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भूमापन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे अडीच लाख रुपये मागणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आरोपी पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याने अखेर गुरुवारी (दि.2) अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली. मुंबई मुख्यालयातून कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठांनी उकंडे याच्याविरुद्ध 24 डिसेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर उकंडे फरार झाला होता.

काय आहे प्रकरण ?
भूमापन कार्यालयातील आश्रय जोशी या व्यक्तीला एक लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाने अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पंकज उकंडे याच्याकडे होता. तपासाच्या नावाखाली उकंडेने जोशीच्या कार्यालयातील तक्ररदार महिला अधिकारी यांच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर त्यांना तुम्हाला या गुन्ह्यात सहआरोपी करणार असल्याचा धाक दाखवला. जर तुम्हाला गुन्ह्यातील आरोपी व्हायचे नसले तर दोन लाख द्यावे लागतील. तसेच जोशीचा पीसीआर वाढविला तर तो तुमचे नाव घेईल आणि हे प्रकरण हाताबाहेर जाईल. त्यामुळे त्याचा पीसीआर न वाढवण्यासाठी पन्नास हजार वेगळे द्यावे लागतील अशी धमकी त्याने दिली होती.

या प्रकरणात कोणताही संबंध नसताना पोलीस अधिकारी पैसे मागत असल्याने तक्रारदार महिलेने अ‍ॅन्टी करप्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे 16 नोव्हेंबर 2019 रोजी उकंडे विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उकंडे विरोधात कारवाईच्या मंजुरीसाठी स्थानिक वरिष्ठांकडून मुंबईच्या मुख्यालयात हे प्रकरण पाठवले. मुख्यालयातून परवानगी आल्यानंतर 31 डिसेबर रोजी पोलीस निरीक्षक उकंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला. त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, याला अटकपूर्व जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्याने गुरुवारी (दि. 2 जानेवारी 2020) अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/