देशात मोदींची जादू कायम, निवडणुका झाल्यास NDA चं सत्तेवर ; सर्वेक्षणातून बाब समोर

पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाष्य शैली त्याचबरोबर कोणताही निर्णय घेताना तसेच एखादी योजना राबवल्यानंतर त्याचा काय परिणाम झालं याबाबत ते थेट जनतेशी संवाद साधतात. देशात एनडीए सत्तेत आल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी जनतेलाच महत्त्व दिले. त्यामुळे लोकांमधील मोदींची क्रेज कमी झाली नाही. त्याचे फलित म्हणजे दुसऱ्यांदा एनडीएला सत्ता मिळाले. दरम्यान,शेतकरी आंदोलन असो वा कोरोनाचे संकट तरीही मोदींची जादू कायम असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनने केल्या सर्वेक्षणात जर आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएनला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती.

या सर्वेक्षणानुसार निवडणुका झाल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केवळ भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे.

केवळ पंतप्रधानांबाबत सर्वेक्षण करण्यात आले नाही तर लोकांना त्यांचे आवडते मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. सर्वेक्षणादरम्यान सर्वाधिक म्हणजेच २५ टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आवडते मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आहेत. त्यांना १४ टक्के लोकांनी पसंती दिली. तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आहेत. त्यांना एकून ८ टक्के लोकांनी पसंती दिली.

आजवरचे आवडते पंतप्रधान कोण?
आजवरचे आवडते पंतप्रधान कोण यावरही सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्येही नरेंद्र मोदी यांनाच मान मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचं म्हटलं.तर १८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली. ११ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आजवरचे आवडते पंतप्रधान असल्याचं म्हटलं.

५० टक्के लोकांची कामाला पसंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना कालावधीत केलेलं काम सर्वोत्तम असल्याचं म्हटलं. तर ५० टक्के लोकांनी त्यांचं काम चांगलं असल्याचं सांगितलं. १८ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांचं काम सरासरी असल्याचं सांगण्यात आलं. तर ७ टक्के लोकांनी त्यांचं खराब आणि २ टक्के लोकांनी त्यांचं काम अतिशय खराब असल्याचं सर्वेक्षणादरम्यान सांगितलं.