Surya Rashi Parivartan 2020 : सूर्याचे तूळ राशी गोचर, ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ग्रहांचा राजा सूर्य 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी तुळ राशीत प्रवेश करणार आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत सूर्य या राशीत राहील. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते मेष राशित सूर्य उच्चचा आणि तुळ राशीत खाचालचा मानला जातो. तुळ राशीत सूर्याचे गोचर वृषभ, सिंह, धनु आणि मकर राशीसाठी लाभदायक मानले जाते. चला जाणून घेऊया सूर्याचे हे राशी परिवर्तन कोणत्या राशीच्या जातकांना लाभ देईल आणि कुणाला नुकसान.

मेष

सूर्य आपल्या राशीच्या सातव्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानात सूर्य दुर्बल अवस्थेत आहे. कामाच्या ठिकाणी उच्च व्यवस्थापनासोबत संबंध खराब होऊ शकतात, परंतु हे मतभेद जास्त न वाढवणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलांचे आरोग्य नाजूक राहू शकते. सूर्यावर शनिची दृष्टीही पडत आहे, यासाठी वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ

सूर्य ग्रहाचे गोचर आपल्या सातव्या स्थानात होत आहे. व्यावसायिक जीवनात उर्जा भरपूर असेल. उत्साह जाणवेल आणि रखडलेली कामेही तुम्ही पूर्ण कराल. जे लोक मोठ्या कालावधीपासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांना अनेक संधी या काळात मिळू शकतात. आईचे खराब आरोग्य आपल्यासाठी चिंतेचा विषय बनू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेवरून भावंडांमध्ये वाद होऊ शकतात.

मिथुन

सूर्य आपल्या राशीच्या प्रेम, बुद्धी आणि संततीच्या पंचम स्थानात गोचर करेल. तुमच्या स्थानाचा स्वामी दुर्बल अवस्थेत आहे. क्षेत्रातील आपले प्रयत्न योग्य दिशेने केले जाणार नाहीत. या गोचर काळात कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा, कारण प्रवासातून लाभाऐवजी नुकसान होऊ शकते. आरोग्याबद्दल बोलायचे तर, आपण बाहेरचे तळलेले, भाजलेले अन्न खाणे टाळावे. दिनचर्येत योग, ध्यान किंवा व्यायामाला स्थान द्या.

कर्क

या गोचर काळात सूर्य आपल्या चौथ्या स्थानात दुर्बल अवस्थेत राहील. या परिस्थितीत सूर्य खूपच दुर्बल समजला जातो, म्हणूनच कर्क राशीच्या लोकांसाठी हे खूप शुभ मानले जाऊ शकत नाही. तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. आईचे आरोग्य नाजूक असू शकते. मालमत्ता इत्यादी व्यवहारात अडचणी येऊ शकतात. यावेळी आपण मालमत्तेशी संबंधित कामे न केल्यास ते आपल्यासाठी चांगले होईल.

सिंह

सिंह राशीच्या जातकांच्या तृतीय स्थानात सूर्याचे गोचर होईल. या वेळी आपली सर्जनशीलता उच्च असेल, आपण आपले प्रयत्न आणि कामे आश्चर्यकारकरित्या पूर्ण कराल. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रशंसा देखील मिळू शकते. आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी ही चांगली वेळ असते. म्हणूनच, जर तुम्ही खेळासारख्या क्षेत्रात असाल तर तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. घरातील वातावरण अत्यंत सौहार्दपूर्ण असेल. आरोग्याच्या बाबतीत काळ चांगला आहे.

कन्या

कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे गोचर साठवलेले धन, कुटुंब आणि बचतीच्या द्वितीय स्थानात होईल. सूर्याचे हे गोचर आपल्यासाठी खूप चांगले म्हणता येणार नाही. खर्च वाढू शकतो. अनावश्यक तणाव आणि मानसिक अस्वस्थता उद्भवू शकते. द्वितीय स्थानातून तुमच्या वाणीवर सुद्धा विचार केला जातो, यासाठी संभाषणादरम्यान योग्य शब्द निवडले पाहिजेत. आर्थिकदृष्ट्या ही वेळ चांगली नाही, म्हणून या गोचर दरम्यान गुंतवणूक करणे टाळावे. या काळात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव दिसू शकतो.

तुळ

सूर्य ग्रहाचे गोचर तुमच्या लग्न स्थानात होईल. सूर्याचे हे गोचर तुमच्यासाठी जास्त अनुकूल असणार नाही. तुमचे यश आणि लाभाच्या स्थानाचा स्वामी सूर्याची ही स्थिती तुमच्यासाठी चांगली नाही, कारण सूर्य येथे आपल्या दुर्बल अवस्थेत आहे. आत्मविश्वासाचा अभाव दिसून येईल. कौटुंबिक जीवन आणि वैयक्तिक संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सूर्य हा कोरडा ग्रह आहे आणि पित्त प्रकृतीचा कारक आहे, म्हणून त्वचेशी संबंधित समस्या या काळात उद्भवू शकतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या जातकांच्या द्वादश स्थानात सूर्याचे गोचर होत आहे. सूर्याचे द्वादश स्थानातील गोचर तुमच्यासाठी शुभ मानले जाऊ शकत नाही. कामे पूर्ण करताना चढ-उतार होऊ शकतात. समस्येचे योग्य निराकरण होणार नाही. आपल्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. या काळात परदेशी देशांशी संबंधित एखादा फायदा तुम्हाला मिळू शकतो. वडिल किंवा वडिलांसमान व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण खराब होईल. शनीची दृष्टी असल्याने तुम्हाला झोपेसंबंधी काही समस्या होऊ शकतात.

धनु

सूर्य या गोचर काळात लाभाच्या एकादश स्थानात असेल. हे गोचर आपल्यासाठी अनेक बाबतीत यशदायक सिद्ध होईल. कार्यक्षेत्रात आपल्या वरिष्ठांकडून प्रशंसा आणि कौतुक होईल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या खुप कमी प्रयत्नातही अनेक महत्वाची कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रातील जवळच्या अधिकार्‍यांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. वडिलांसोबचे मतभेद दूर होतील. आरोग्य चांगले राहील आणि तंदुरुस्त असल्याचे वाटेल.

मकर

मकर राशीच्या जातकांच्या दशम स्थानात सूर्यदेवाचे गोचर होईल. या स्थानातून आपले कर्म आणि करियरचा विचार केला जातो. सूर्याचे हे गोचर तुमच्यासाठी शुभ असेल. र्काक्षेत्रातील वरिष्ठ आणि अधीनस्थांपेक्षा दोन पाऊल पुढे असाल. पदोन्नतीचे योग आहेत. वडिलांशी याकाळात संबंध सुधारतील. जोडीदाराकडून एखादे सरप्राईझ गिफ्ट मिळू शकते. या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या जातकांच्या नवम स्थानात सूर्याचे गोचर होत आहे. जोडीदाराशी आपसात वाद होऊ शकतात. परंतु प्रत्येक परिस्थितीत जोडीदाराची समजूत घातली पाहिजे, कारण त्यांची साथ कुठे ना कुठे तुमच्या भाग्याशी आणि प्रगतीशी जोडलेली आहे. खर्च वाढू शकतो आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. धैर्य बाळगले पाहिजे. वडील किंवा वडिलांसमान अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतेही पाऊल उचलले पाहिजे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍यांच्या एकाग्रतेत घट होऊ शकते. आरोग्य ठीक राहील, पण खाण्या-पिण्याविषयी सावधगिरी बाळगावी लागेल.

मीन

सूर्य ग्रहाचे गोचर तुमच्या परिवर्तन आणि अनिश्चिततेच्या अष्टम स्थानात होईल, ज्यामुळे तुमच्या जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर हा काळ आव्हानात्मक असेल. आपण नोकरीत बदल करण्याबद्दल विचार करत असाल तर सध्या हा विचार करणे थांबवा. तुमचे शत्रू तुमच्याविरूद्ध एक प्रकारचे षडयंत्र रचू शकतात. या गोचरच्या दरम्यान खूप सावध असणे आवश्यक आहे. सासरच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात. तुम्हाला डोळे आणि दातांशी संबंधीत समस्या होऊ शकतात.