अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण अजित पवार आणि भाजपची जवळीक वाढतेय ?, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेला आहे. याबाबतचा सकारात्मक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप यांच्याशी जवळीक वाढलीय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. याचा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहावा, अशी आग्रही मागणी सत्ताधारी शिवसेना पक्षाची होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाने हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीवरुन दोन घटना प्रखरतेने लक्षात आल्या आहेत. त्या म्हणजे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात एक प्रकारचा वाद समोर आला होता. पार्थ पवार इतक्यावर न थांबता त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदनही सादर केले आहे. पार्थ पवार याच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन आजोबा तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती.

मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युर आहे, अशा कडव्या शब्दांत शरद पवार यांनी फटकारलं होतं. शरद पवारांच्या अशा भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील नाराज होते. तो लहान आहे, हळूहळू कळेल. पण, जाहिररित्या असे त्याला बोलणे योग्य नव्हे, असे मत अजित पवार यांचे होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थबाबत केलेल्या विधानावरुन पुन्हा एकदा पवार कुटुंबातील मतभेदावर चर्चा झाली. पार्थ पवारांनी कुटुंबातील नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्या. पार्थ लवकर मोठा निर्णय घेईल, असेही सांगितले जात होते.

पार्थ पवार यांनी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबतही पार्थ पवारांची भेट झाली होती. पार्थ प्रकरणात सर्वकाही आलबेल आहे, असे चित्र समोर आले होते. त्यानंतर या वादावर पडदा पडणार,असे वाटत असताना सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पार्थ यांनी केलेले ‘सत्यमेव जयते’ या ट्विटचे अनेक अर्थ काढण्यासारखे आहेत. एकीकडे राज्य सरकार या निर्णयावर सल्लामसलत करत असताना खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नातूने अशाप्रकारे ट्विट केल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. कारण, जाहिररित्या आजोबांनी फटकारल्यानंतरही पार्थ यांनी त्यांची भूमिका योग्य आहे, असे ट्विटमधून मांडली आहे का? असा आता प्रश्न उपस्थित होत आहे.