राजकीय फायद्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी, गृहमंत्र्यांचा भाजपवर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने घेतलेले ड्रग्जचे वळण सध्या देशभरात चर्चेचा विषयी झाले आहे. सीबीआय, एनसीबी या एजन्सीज प्रकरणाचा तपास करत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घातले आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजकीय फायद लाटण्यासाठी आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी हे प्रकरण तापवले जात असल्याचा आरोप भाजपावर केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले की, बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आखण्यात आला आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबई पोलिसांना, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे.

गृहमंत्री म्हणाले, पोस्टमार्टेममध्ये सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष आढळून आले नसल्याचे एम्सच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू होता, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र तरीही मुंबई पोलिसांना नाहक बदनाम करण्यात आले.

देशमुख म्हणाले, बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत प्रकरण पुढे नेण्यात आले. मुंबई पोलिसांसह अनेकांवर आरोप करण्यात आले. मुंबई पोलीस काही जणांना वाचवत असल्याचा आरोपही करण्यात आला. बिहारचे डीआयजी गुप्तेश्वर पांडे यांचाही यामध्ये वापर करून घेण्यात आला. आता पांडे जेडीयूमध्ये गेले आहेत.

पवारांनीही केली टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सुशांत सिंह प्रकरणावर भाष्य करताना सीबीआयवर टीका केली आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्याचे काम सीबीआयच्या हाती देऊन जवळपास दीड महिना झाला. त्यांनी काय दिले, कुठे उजेड पाडला. तो त्याचा प्रकाश मला अजून तरी दिसलेला नाही, असे म्हणत पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला.