CBI कडे तपास देण्यास हरकत नाही, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी त्यांच्या कुटूंबीयांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सात्यत्याने पाठपुरावा सुरु असताना, सुशांतच्या कुटूंबीयांनी शांत राहावे आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावे, असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यावरुन विरोधकांकडून राऊत यांच्यावर टिका करण्यात आली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुशांत आमचा देखील मुलगा होता. मुंबई पोलीस सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहेत.” असं त्यांनी म्हटलं आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत म्हणाले, “सुशांत आमचा देखील मुलगा होता. तो मुंबईत राहत होता. सुशांत बरोबर आमचं काही वैर नाही. त्याच्या मृत्यूमागचं खरं कारण बाहेर पडावं, त्याला न्याय मिळावा अशी आमची देखील इच्छा आहे. फक्त सुशांतच्या चाहत्यांनी थोडा संयम बाळगावा आणि मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवावा. जर तुम्हाला वाटत असेल की, पोलीस आपलं काम योग्य रीतीने करत नाही. तर, तपास सीबीआयकडे देण्यास हरकत नाही.” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

याआधी संजय राऊत यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरुन ‘रोखठोक’ सदरातून अनेक सवाल उपस्थित केलेले. “मुंबई पोलीस ही जगातील सर्वोच्च तपास यंत्रणा असून ते कोणाच्या दबावाला बळी पडत नाही. ते पूर्णरीत्या प्रोफेशनल आहेत. शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास त्यांनी लावला. त्यात अनेक बडी नावे होती, मात्र पोलिसांनी सर्वाना तुरुंगात टाकले. २६/११ चा दहशतवादी हल्ला मुंबई पोलिसांनीच परतवून लावला व कसाबला फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. ‘सीबीआय’ ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकवेळा दिसून आलं आहे. तसेच अनेक राज्यांनी त्यावर बंदी घातल्याचं त्यांनी नमूद केलं.”