Video : ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपाकडून जोरदार टीका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भाजपनं बिहार निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका करत महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार देवेंद्र फडणवीस करणार का ? असा सवाल केला होता. तसंच मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 80 हजार बनावट अकाऊंट उघडण्याचा प्रकार समोर आल्यावर त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. ते महाविकास आघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, “गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकास आघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. याआधी भाजप सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकलेले नाहीत. आता सुशांत प्रकरणी त्यांनी बोगस अकाऊंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाहीतर जनतेची माफी मागून तोंड काळं करा” असा घणाघात त्यांनी केला आहे.”

अतुल भातखळकर म्हणतात, “अनिल देशमुख यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर खोटे राजकीय आरोप केले. अनिल देशमुखांच्या आरोपांचा आम्ही तीव्र निषेध करतो. तुम्हाला जी चौकशी करायची ती खुशाल करा. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही बेकायदेशीर काम केलं नाही.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”

भातखळकर असंही म्हणाले, “अनिल देशमुख यांनी पूर्वी सांगितलं होतं की, भाजप सत्तेत असताना त्यांनी पोन टॅपिंग केलं त्याची चौकशी करू. या चौकशीचं काय झालं हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्राची बदनामी दुसरं कोणी करत नसून राज्यातील महाविकास आघाडीच करतेय. राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचाराकडे लक्ष द्यावं. पुण्यात गोळीबार झाला त्याकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय गृहमंत्री इतके बेजबाबदार कधीही पाहिले नाहीत.” अशी बोचरी टीका त्यांनी केली.