SSR Case : सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली ?, महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डायरी लिहण्याची सवय होती. त्याच्या पर्सनल डायरीतून खूप मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये मुंबई पोलिसांनी सुशांतची डायरी जप्त केली होती. ही डायरी आता सीबीआयच्या हाती लागली आहे. मात्र, या डायरीतील काही पानं फाडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सुशांत नियमित डायरी लिहायचा. याबाबत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिताने माहिती दिली होती. वर्तमानातील नोंदी आणि भविष्यातील त्याची स्वप्न या डायरीमध्ये होती. शिवाय काही आर्थिक बाबींच्या नोंदी असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे सीबीआय तपासात सुशांतची पर्सनल डायरी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

सुशांचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी देखील याबाबत उल्लेख केला होता. या डायरीतून अनेक खुलासे होऊ शकतात असं त्यांनी सांगितले होतं. मात्र, या डायरीतील काही पानं गायब आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, या डायरीत एका नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतरची पानं गायब असल्याचं सांगितलं जात आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांना बरीच माहिती मिळाली. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती, आमि शोबिज चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती पोलिसांना मिळाली होती. कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांची भूमिका काय असेल, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने डायरीत लिहले होते.