SSR Death Case : मिडीया ट्रायल थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. सुशांत प्रकरणात मीडिया ट्रायल थांबविण्यासाठी ही जनहित याचिका दाखल केली गेली आहे. याचिकेत उच्च न्यायालयात मागणी करण्यात आली आहे की सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणी टीव्ही आणि प्रिंट मीडियाला मीडिया ट्रायलपासून रोखण्यात यावे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा सीबीआय सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करत आहे. बुधवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने देखील एनडीपीएस कायद्यांतर्गत रिया चक्रवर्तीसह इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो या प्रकरणात ड्रग एंगलची चौकशी करेल.

यापूर्वी गुरुवारी सकाळी सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह यांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना केके सिंह म्हणाले की, ‘रिया माझ्या मुलाला बऱ्याच काळापासून विष पाजत होती. ती खुनी आहे. तपास यंत्रणेने रिया आणि तिच्या साथीदारांना त्वरित अटक करुन त्यांना शिक्षा करावी.’ त्याचवेळी रिया चक्रवर्तीने तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे जीवन धोक्यात आले आहे असे सांगितले आहे. रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की कशा पद्धतीने त्यांना चौकशीसाठी येता जाताना लोकांद्वारे वेढले जाते.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर आधीच आर्थिक गुन्हा आणि सुशांत सिंहचा मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पटना येथे एफआयआर दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर सीबीआय आता या प्रकरणात चौकशी करत आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत आहे.