सुशांत सिंह राजपूत सुसाईड केस : गृहमंत्री अनिल देशमुखांनी फेटाळली CBI चौकशीची मागणी ! अंतिम रिपोर्टबद्दल ‘ही’ दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटी आणि काही राजकीय लोकही सतत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. परंतु ताज्या रिपोर्टनुसार आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली आहे. मुंबई पोलीस या तपासासाठी सक्षम आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार अनिल देशमुख म्हणाले, “माझ्याकडे सीबीआय चौकशीच्या कॅम्पेनचे अनेक ट्विट्स आले. परंतु मला वाटतं की, सीबीआय चौकशीची गरज नाही. मुंबई पोलीस याचा तपास करतील. पोलीस प्रत्येक अँगलनं या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास पूर्ण होताच याच्या अंतिम रिपोर्टमधील सविस्तर माहिती शेअर केली जाईल.”

गेल्या अनेक दिवसांपासून सोशलवर सुशांतच्या सीबीआय चौकशीची मागणी सुरू आहे. यात चाहते तर आहेच सोबत अभिनेता शेखर सुमन, अभिनेत्री आणि भाजप खासदार रूपा गांगुली, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे. रियानं तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना टॅग करत पोस्ट शेअर केली होती आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती.