Sushant Singh Rajput drug case : NCB आज न्यायालयात सादर करणार आरोपपत्र, अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 33 जणांची नावे

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेता सुशांत सिंह राजपुत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून शुक्रवारी (दि. 5) न्यायालयासमोर 30 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे स्वतः आरोपपत्र सादर करणार आहेत. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. तेंव्हापासून एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यांनी तब्बल 30 हजार पानाचे आरोपपत्र तयार केले असून यात सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासह 33 जणांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह 14 जून 2020 रोजी संशयास्पद आढळला होता. मुंबईतील वांद्रे परिसरातील घरात त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्याच्या मृत्यूवनंतर प्रचंड वादविवाद झाले. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप अनेकांनी केला. त्याने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली? हा वाद सुरू असतानाच ड्रग्ज प्रकरण समोर आल्याने एनसीबीने तपास सुरू केला होता. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर तिला अटक केली होती. तसेच एक महिना ती तुरूंगातही होती. या प्रकरणाचा तपास करताना एनसीबीने अनेक ठिकाणी धाडी टाकत ड्रग्ज जप्त केले होते. तसेच तपासा दरम्यान काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती, त्यांचेही नावे या आरोपपत्रात असल्याची माहिती समोर आली आहे.