SSR Death Case : ‘मुंबई पोलिसांवर बिलकुल विश्वास नाही’, सुशांतच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात दिवसेंदिवस गुंतागुंत निर्माण होत आहे, गुरुवारी दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात रिया चक्रवर्तीच्या याचिकेविरोधात नुकत्याच केलेल्या निवेदनात अनेक दावे केले आहेत. सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांनी आपल्या लेखी सबमिशनद्वारे म्हटले आहे की, त्यांना मुंबई पोलिसांवर अजिबात विश्वास नाही. पटना येथे रिया चक्रवर्तीच्या विरोधात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरचा तपास करण्याचा अधिकार बिहार सरकारला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी असेही म्हटले आहे की, हे प्रकरण सीबीआयला देणे अधिक योग्य आहे कारण कार्यक्षेत्रात दोन राज्ये समाविष्ट आहेत आणि विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना तपासासाठी सहकार्य केलेले नाही. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे, तर शवविच्छेदन, सीसीटीव्ही फुटेज यासह अन्य महत्त्वाचे अहवालही बिहार पोलिसांशी शेअर केले गेले नाहीत आणि म्हणूनच न्यायासाठी सीबीआय चौकशी पूर्णपणे कायदेशीर आहे.

यापूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांनीही 9 पानांचे एक खुले पत्र देखील शेअर केले होते. त्यात असा आरोप केला गेला होता की अभिनेत्याची हत्या करण्यात आली आहे आणि आता कुटुंबाला धमकी मिळत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊतांद्वारे दिवंगत अभिनेत्याच्या कुटूंबातील नातेसंबंधावर शंका घेतल्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी प्रतिष्ठा संपवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेवर टीका केली आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला दोन महिने झाले असून अद्याप त्यांच्या मृत्यूबद्दल बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. अलीकडील काळात ईडीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांची बराच काळ चौकशी केली आहे. सुशांत प्रकरणाबाबत त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल आहे.