सुशांतचा ’तो’ फोटो पोस्ट करणे येऊ शकतं ‘अंगलट’ !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र यातच सोशल मीडियावर त्याच्या मृतदेहाचे फोटो अपलोड करण्याचा ट्रेंड दिसून आला आहे. चित्रपटाच्या कलाकारांपासून ते त्यांच्या चाहत्यांपर्यंत मृतदेहाचे फोटो अपलोड करू नका, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता महाराष्ट्र सायबर सेलनेही निषेध करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने ट्वीट केले आहे की, सोशल मीडियावर सध्या एक चिंताजनक ट्रेंड दिसत आहे. यात दिवंगत सुशांत सिंह राजपूत यांचा फोटो व्हायरल केला जात आहे. हे फारच वाईट आणि त्रासदायक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सायबर सेलने कारवाईचेही आदेश दिले आहे. ट्विटमध्ये त्यांनी, सोशल मीडियावर असे फोटो पसरवणे कायदेशीर मार्गदर्शक सूचना आणि कोर्टाच्या आदेशांच्या विरोधात आहे. असे केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. असे चित्र सामायिक करण्यास टाळावे असे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर पसरलेला व्हायरल झालेला तो फोटो काढून टाकण्यात यावा, असेही ट्वीट केले आहे.

सुशांतवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच्या वडिलांसह त्याचे कुटुंब मुंबईत पोहचले आहे. रविवारी रात्री उशीरा सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. गेले 6 महिने तो नैराश्येत होता. त्यामुळे नैराश्येतूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.