सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरनं सांगितल्या आठवणी, शेअर केली ‘इमोशनल’ पोस्ट !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. अनेकजण आता यावर भाष्य करत प्रतिक्रिया देत आहे. सुशांतला जाऊन 4-5 दिवस उलटूनही अभिनेत्री श्रद्धा कपूर आजही दु:खात आहे. छिछोरे सिनेमात तिनं त्याच्यासोबत काम केलं होत. श्रद्धानं त्याची आठवण काढत एक इमोशनल नोट शेअर केली आहे.

श्रद्धानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये श्रद्धा म्हणते, “जे झालं आहे ते स्विकार करण्याचा प्रयत्न करत आहे. खूप अवघड आहे. एक मोठी पोकळी वाटत आहे. सुशांत. प्रिय सुश. विनम्र, बुद्धिवान, जीवनासाठी जिज्ञासू. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहणारा. प्रत्येक ठिकाणी आपल्याच मस्तीत नाचणारा. सेटवर कायम आशावादी राहणारा. विचार करतेय आमचं पुढील बोलणं कोणत्या विषयावर झालं असतं. एक चांगला सहकलाकार आणि माणूस होता.”

सुशांतसोबतची आठवण सांगत श्रद्धा पुढं म्हणते, “ज्या लोकांची त्याला कदर होती त्यांना तो खुश पाहू इच्छित होता. त्याची ती गोड स्माईल. शुटींगदरम्यान आम्ही खगोल शास्त्र आणि इतरही अनेक गोष्टींवर भाष्य करायचो. जे क्षण आम्ही सोबत घालवले होते ते जादुई होते. त्याच्या घरची ती कविता आणि संगीताची संध्याकाळ. त्यानं त्याच्या टेलीस्कोपमधून चंद्र दाखवला होता आणि मी हे सौंदर्य एवढ्या जवळून पाहून नि:शब्द झाले होते.”

श्रद्धा पुढं म्हणते, “आमची छिछोरेची गँग त्याच्या घरी गेली होती. जिथं शांतता आणि निसर्गानं मन मोहित केलं होतं. त्याचं निसर्गावर खूप प्रेम होतं. सामान्य गोष्टीही त्याला मोहित करत असत. तो त्या गोष्टींना त्याच्या जीनियस अंदाजानं पहायचा. खरंच त्याच्यासारखा तो एकटाच होता. खूप आठवण येईल. सर्वात प्रिय. चमकत रहा.”