PK साठी सुशांत सिंग रजपूतने मानधन घेण्यास दिला होता नकार; कारण ऐकून व्हाल चकित

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग रजपूत आज तो हयात नसला तरी त्याच्या चाहत्यांच्या तो आठवणीत आहे. सुशांतने खूपच कमी काळात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळवले. सुशांत हा जितका चांगला अभिनेता होता, तितकाच चांगला माणूस देखील होता. त्याच्या चांगुलपणाचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याला चांगलेच मिस करत आहेत.

आमिर खान आणि अनुष्का शर्माची मुख्य भूमिका असलेल्या ‘पीके’ या चित्रपटात सुशांत एका छोट्याशा पण महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. सुशांत ‘पीके’ या चित्रपटात केवळ १५ मिनिटांसाठी होता. त्यामुळे इतक्या छोट्या भूमिकेसाठी त्याने मानधन घेण्यास नकार दिला होता. त्याच्या या कृतीमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

सुशांतने ‘पीके’ या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतले नसल्याने राजकुमार हिराणी यांनी त्याला या चित्रपटात काम केल्याबद्दल एक छोटीशी भेटवस्तू दिली होती. ‘पीके’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर राजकुमार हिरानी यांनी सुशांतला चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शनासंबंधीची अनेक पुस्तकं भेट म्हणून दिली होती. सुशांतला नेहमीच लिहिण्याची आणि वाचण्याची आवड होती. तो नेहमी त्याच्यासोबत एक तरी पुस्तक ठेवायचा. त्यामुळे हिरानी यांच्याकडून मिळालेली ही भेट त्याला खूप आवडली होती.

सुशांतने ‘कई पो छे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘एम एस धोनी’, ‘केदारनाथ’ यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या.