‘सुशांत एवढाही कमजोर नव्हता की, तो आत्महत्या करेल’, Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं ठामपणे सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिहार पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिची चौकशी केल्यानंतर तिनं अनेक बाबींचा खुलासा केला आहे. यावेळी अंकितानं सांगितलं की, सुशांत एवढाही कमजोर नव्हता की, तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलेल. तिनंही हेही सांगितलं की, सुशांतच्या कुटुंबीयांसोबत तिची नेहमीच बातचित होत असे. सुशांत आणि अंकिताचा जास्त संपर्क नव्हता. त्याच्या जवळच्या मित्रांकडून त्याच्याबद्दल समजत असे. रिया सुशांतवर जास्त वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असे अशी माहिती अंकिताला सुशांतची बहिण आणि त्याच्या मित्रांकडून मिळाली होती.

बिहार पोलिसांनी सुशांतचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत फोनवरून संवाद साधला आहे. लवकरच या प्रकरणी समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. बिहार पोलिसांकडून जवळपास 10 जणांचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर पटणा पोलीस या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पडताळून पाहणार आहेत. विवेक मल्होत्रा नावाची व्यक्तीही सुशांतच्या संपर्कात होती अशी माहिती आहे. त्याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

अंकितानं अशीही माहिती दिली आहे की, रियासोबतच्या नात्यात सुशांत खुश नव्हता. त्याची बहिण मितू सिंह हिनंही रियावर अनेक आरोप केले आहेत. रिया ब्लॅक मॅजिक करत असल्याचंही ती बोलली आहे. सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नोकरानं मितूला या संदर्भात सांगितलं होतं.