सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास CBI कडं देण्यासंदर्भातील याचिका SC नं फेटाळली, सर्वोच्च न्यायालय म्हणाले – ‘पोलिसांना त्यांचे काम करू द्या’

नवी दिल्ली : बॉलीवुडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने गुरूवारी फेटाळली. प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, मुंबई पोलिसांना काम करू दिले पाहिजे.

चीफ जस्टिस एस. ए. बोबडे, जस्टिस ए. एस. बोपन्ना आणि व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या पीठाने म्हटले की, मुंबई पोलिसांना त्यांचे काम करू दिले पाहिजे आणि जर काही असेल तर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली पाहिजे. अल्का प्रिया यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मागणी केली होती की, सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला पाहिजे.

सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या पीठाने म्हटले की, जर तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत, तर मुंबई हायकोर्टात जावे. सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला कथितरित्या आत्महत्या केली होती. तो दुपारी मुंबईच्या आपल्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेला आढळून आला होता. यानंतर मुंबई पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी महेश भट्ट, करण जोहरसह अनेक प्रसिद्ध दिग्गजांचे जबाब नोंदवले होते. तर, येत्या काही दिवसात आणखी काही अ‍ॅक्टर-अ‍ॅक्ट्रेसची चौकशी होऊ शकते. देशभरात दिवंगत अ‍ॅक्टरचे फॅन्स प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. परंतु, मुंबई पोलीस सीबीआयकडे तपास देण्यास तयार नसल्याने फॅन्सचा संताप वाढत चालला आहे. याशिवाय भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा सीबीआयकडे प्रकरण सोपवण्याची मागणी केली आहे.

रिया चक्रवर्ती सुद्धा पोहचली सुप्रीम कोर्ट
सुशांत प्रकरणात वडील के.के. सिंह यांनी पाटणामध्ये अ‍ॅक्ट्रेस रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर रियाने सुद्धा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. रियाने बुधवारी आपल्या वकिलाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, ज्याद्वारे तिने तपास बिहार पोलिसांकडून ट्रान्सफर करून मुंबई पोलिसांकडे देण्याची मागणी केली आहे.