SSR Death Case : सुशांत प्रकरणी पार्थ पवार म्हणाले ’सत्यमेव जयते’ !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानेही आज महत्त्वपूर्ण निकाल देत मुंबई पोलिसांना या प्रकरणात गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे देण्यास सांगितले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणी कोर्टाच्या निर्णयावर सत्यमेव जयते असे ट्वीट केले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्र सरकारला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले आहे. ’सत्यमेव जयते’, असे सूचक ट्वीट पार्थ पवार यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनीरित्या फटकारल्यानंतरही पार्थ पवार याप्रकरणी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकणी सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी प्रतिक्रिया दिली होती. सुप्रीम कोर्ट आज निर्णय देईल, त्यानंतर राज्य सरकार पुढील भूमिका घेईल, असे त्यांनी म्हटले होते.