15 कोटींपासून ते दागिने गायब होण्यापर्यंत सुशांत सिंहच्या वडिलांनी उपस्थित केले ‘हे’ 7 मोठे प्रश्न

नवी दिल्ली. वृत्तसंस्था : सुशांत सिंह राजपूत यांचे वडील केके सिंह यांनी मुलाच्या निधनानंतर सुमारे दीड महिन्यांनंतर मौन तोडले आहे. अभिनेत्री आणि सुशांत सिंह यांच्या जवळ असलेली रिया चक्रवर्ती यांच्यावर आता केके सिंहने खूप गंभीर आरोप केले आहेत. यावेळी केके सिंह यांनी सुशांतशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत, आणि बरेच प्रश्न देखील विचारले आहेत. केके सिंह यांनी 25 जुलै रोजी बिहारच्या राजीवनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रिया आणि तिच्या संपूर्ण कुटुंबावर आरोप केले आहेत.

बिहारमध्ये दाखल केलेल्या एफआयआर क्रमांक 241/20 मध्ये रिया चक्रवर्ती सहित सहा जणांवर आयपीसीच्या कलम 340, 341, 342, 380, 406, 420 आणि 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती व्यतिरिक्त इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुति मोदी व इतरांच्या विरुद्ध फसवणूक, बेईमानी, ओलिस ठेवणे आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप लावला आहे. एफआयआर मध्ये सुशांत सिंह यांच्या वडिलांनी हे 7 महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.

सुशांतच्या वडिलांनी विचारले हे 7 प्रश्न –

1. सुशांत 2019 पर्यंत अगदी ठीक होता मग अचानक त्याला मानसिकदृष्ट्या त्रास कसा होऊ लागला?

2. जर असेच होते आणि त्याच्यावर उपचार चालू होते तर मग आमच्याकडून कोणत्याही प्रकारची परवानगी का नाही घेतली गेली?

3. ज्या-ज्या डॉक्टरांनी माझ्या मुलावर उपचार केले आणि त्याला कोणते औषध दिले गेले याची चौकशी झाली पाहिजे.

4. जर रियाला माहित होते की सुशांत आजारी आहे, तेव्हा त्याला एकटे सोडणे, उपचारांचे सर्व कागदपत्र आपल्यासोबत घेऊन जाणे, त्याचाशी सर्व प्रकारचे संपर्क तोडणे, तिने असे का केले? याची चौकशी झाली पाहिजे.

5. रियाच्या आल्यानंतर सुशांतचे चित्रपट कमी का येऊ लागले याची चौकशी व्हायला हवी.

6. रिया सुशांतची महत्वाची कागदपत्रे, क्रेडिट कार्ड, दागिने, रोकड, लॅपटॉप सहित इतर वस्तू का घेऊन गेली, याची चौकशी झाली पाहिजे.

7. माझ्या मुलाच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये एका अशा खात्यात ट्रान्सफर झाले ज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. या प्रकरणात त्याच्या सर्व बँक खात्यांची चौकशी झाली पाहिजे.