राजाचा कसा झालो रंक कळलेच नाही ! केबीसीमध्ये 5 कोटींचे बक्षीस जिंकणार्‍या सुशीलवर आली ‘ही’ वेळ

पोलिसनमाा ऑनलाईन टीम- कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात 2011 मध्ये सुशील कुमार 5 कोटींचे बक्षीस जिंकणारा पहिला स्पर्धक ठरला होता. मिळालेल्या पैशांमधून खूप काही चांगल्या गोष्टी करण्याची त्याला संधी होती. परंतू पैसे गुंतवताना घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आता सुशील कुमारला हालाकीचे आयुष्य जगावे लागत आहे. आयुष्यात सर्व कसं बिघडत गेले हे सुशीलने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

सुशील कुमारने पोस्टमध्ये लिहले की, तो काळ असा होता की मी सेलिब्रेटी बनलो होतो. बिहारमधील प्रत्येक कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे. याच प्रसिद्धीमुळे माझे शिक्षण मागे पडले. त्यावेळी मी मीडियाला खूप सिरीअसली घ्यायचो, काही स्थानिक उद्योगांमध्ये मी पैसे गुंतवले होते. परंतू यातील बहुतांश उद्योगधंदे हे बुडाल्यामुळे मला आर्थिक फटका बसला. त्याकाळात मला दानधर्म करण्याची सवय होती. मी महिन्याला 50 हजार रुपये दान करायचो. अनेकांनी यानंतर माझ्या सवयीचा गैरफायदाही घेतला. त्यानंतर माझ्या पत्नीसोबत माझे संबंधही तणावाचे व्हायला लागले.

यानंतर ट्रॅव्हलिंगच्या धंद्यात पैसे गुंतवले, ज्यातून महिन्याला उत्पन्न मिळत होते. धंद्याच्या निमीत्ताने सुशील कुमार नेहमी दिल्लीला प्रवास करताना त्याची ओळख काही विद्यार्थ्यांसोबत झाली. त्यांच्याशी बोलल्यानंतर आपण या सर्वांपेक्षा किती कमी आहोत याची जाणीव सुशीलला झाली. दरम्यानच्या काळात सुशीलला चित्रपटांचे वेड लागले होते. त्यानंतर सुशीलने मुंबईत येऊन टिव्ही इंडस्ट्रीत काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातही त्याला अपयश आले. अखेरीस चूक उमगल्यानंतर सुशीलने पुन्हा गावी परतण्याचे ठरविले. गावी आल्यानंतर त्याने शिक्षक बनण्यासाठीची परीक्षा दिली. सध्या सुशील स्थानिक सामाजिक संघटनांसोबत छोटी-मोठी कामं करतो. अभ्यासात मन रमवल्यानंतर आता दारु-सिगरेट याची आठवणही येत नसल्याचे सुशीलने सांगितले आहे .