राहूल गांधींची मोठी घोषणा ; सुशीलकुमार शिंदेंची ‘या’ महत्वाच्या पदावर नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशा पाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्राबाबत मोठी घोषणा केली असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राज्याच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या विविध समन्वय समिती संदर्भात कॉंग्रेसची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.

प्रभारी असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर समन्वय समितीची धुरा सोपवण्यात आली आहे. समित्यांच्या सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसचे प्रचारप्रमुखपद देण्यात आले आहे. तर जाहीरनामा समितीचे प्रमुखपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. खासदार कुमार केतकर यांच्याकडे माध्यम समितीचे प्रमुखपद देण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटची इनिंग आहे. त्यामुळे एक एक जागा पवार यांच्यासाठी महत्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली इनिंग सुरू झाली असल्यामुळे त्यांच्यासाठीही लोकसभेची एक एक जागा महत्वाची असणार आहे. यात दोन पावले मागे कोण जाणार, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होणार असून या सर्वांवरच आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.