‘त्या’ हिंदू मुलींना परत करा ; सुषमा स्वराज यांचा पाकला इशारा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – होळीच्या पूर्वसंध्येला दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांचे धर्मांतरण करून लग्न लावून देण्यात आले. ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडली. मात्र या घटनेची गंभीर दखल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली आहे. ‘त्या’ हिंदू मुलींना त्यांच्या कुटुंबियांकडे परत करण्याचा इशारा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

याबाबत बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या, असे धर्मांतरण करणे चुकीचे आहे. ते मान्य नाही. तसेच नव्या पाकिस्तानचे पंतप्रधानही यावर विश्वास ठेवणार नाहीत की इतक्या छोट्या वयात या मुली स्वत: धर्मांतर करण्याचा आणि लग्नाचा निर्णय घेतील’, या मुलींपैकी रवीना केवळ १३ वर्षांची असून रिना १५ वर्षांची आहे, असे ट्विट करत सुषमा स्वराज यांनी दोन्ही मुलींना तात्काळ त्यांच्या कुटुंबांकडे सोपवण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण ?

पाकिस्तानातील सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातील ही घटना आहे. होळीच्या एक दिवसआधी काही अज्ञात लोकांकडून दोन हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी रवीना केवळ १३ वर्षांची असून रिना १५ वर्षांची आहे. अपहरण केल्यानंतर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओत दोन्ही मुलींचा जबरदस्तीने एका मौलाना लग्न लावून देताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत या अल्पवयीन मुली खुशीने इस्लाम धर्म कबूल केल्याचं सांगण्यात आलंय. माहितीनुसार पाकिस्तानमधील हिंदू समुदायाने या घटनेचा विरोध करत निर्दशने केली आहेत. संबंधित दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.