बाप रे ! सुष्मिता सेनला जिवंत राहण्यासाठी करावे लागायचे ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या अफेअरमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याशिवाय ती तिच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. तुम्ही सुष्मिताचा फिटनेस पाहिला तर ती फिटनेसला घेऊन किती जागरुक आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला आज सुष्मिताचे एक खास सिक्रेट सांगणार आहोत. सुष्मिता सेन एकेकाळी इतकी आजारी होती की जिवंत राहण्यासाठी तिला दर आठ तासांनी स्टेरॉईड घ्यावे लागत होते. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे.

‘स्टेरॉईड घेणे हा एकच पर्याय माझ्या समोर होता’

2014 मध्ये सुष्मिता खूपच आजारी होती तेव्हाचा हा किस्सा आहे. याबाबत बोलताना सुष्मिता म्हणाली की, “2014 साली निरबाक या बंगाली सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले आणि यानंतर मी अचानक आजारी पडले. मला काय होत आहे हे कुणालाच कळत नव्हते. एकदा मी अचानक बेशुद्ध पडले त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तापासणी केल्यानंतर समजले की, माझ्या अॅड्रेनल ग्लॅंड्स या ग्रंथीमधील कोर्टिसोल नावाचे हार्मोन्स तयार होणे बंद झाले. त्यामुळे माझ्या शरीरातील अवयव निकामी होऊ लागले होते. यावर एकच उपाय होता तो म्हणजे दर आठ तासांनी hydrocortisone नावाचे स्टेरॉईड घेणे.”

‘मी विश्वसुंदरी असल्याने मला सुंदर दिसणे भाग होते’

पुढे बोलताना सुष्मिता म्हणाली की, “या आजारपणानंतरची पुढील दोन वर्ष माझ्यासाठी खूपच कठिण होती. या स्टेरॉईडमुळे माझे केसही गळू लागले होते. माझे वजनही वाढू लागले होते. एकीकडे मी माझी विश्वसुंदरी होते. त्यामुळे मला सतत सुंदर दिसणे भाग होते. दुसरीकडे माझ्या मुलींनाही माझी गरज होती. त्या काळात मी जणू वेडी झाले होते. 2014 आणि 2016 चे माझे फोटो जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल मी खूपच वेगळी दिसत आहे. यामागे हेच कारण आहे.”

‘आणि मी त्या जीवघेण्या आजारातून बाहेर आले’

पुढे सुष्मिता म्हणते की, “मी उपचारासाठी लंडन तसेच जर्मनीला गेले. त्याकाळात मी या आजाराशी लढण्याचा निर्धार केला. कारण मला एक आजारपण घेऊन मरण्याची अजिबात इच्छा नव्हती. यानंतर मी योगसाधना सुरु केली. शरीरावर प्रचंड मेहनत घेतली. 2016 च्या अखेरीस माझी स्थिती बिघडली होती. मला अबुधाबीच्या एका रुग्णालयात दाखल केले. पु्न्हा तपासण्या झाल्या. मी परत येत असताना मला स्टेरॉईडची गरज नाही असे सांगण्यात आले. कारण माझ्या शरीरात कोर्टिसोल बनणे सुरु झाले होते. हे ऐकून मी स्तब्ध झाले होते. मी त्या जीवघेण्या आजारातून बाहेर आले.”