पालघरच्या समुद्रात संशयास्पद ‘बोट’ ; पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसली असून ही बोट सध्या समुद्रात फिरत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तटरक्षक दलाने पालघरच्या मच्छीमारांशी सकाळीच बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. तसेच मच्छीमारांना काही हालचाली दिसल्यास तटरक्षक दल किंवा पोलिसांना ताबडतोब कळविण्यास सांगितले आहे.

तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, अन्नधान्य आणि इंधनाचा मोठा साठा असलेली ही बोट श्रीलंकेच्या समुद्रातून पालघरच्या समुद्रात आली आहे. ही बोट सध्या समुद्रात फिरत आहे. संरक्षण यंत्रणेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पालघर पोलिस सतर्क झाले असून किनारपट्टीवरील संशयास्पद हालचाली टिपून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात इंटेलिजन्स ब्युरो, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवादी विरोधी पथक, कोस्टगार्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, सर्व सागरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्र पोलिसांना किनाऱ्यापासून १२ नॉटिकलपर्यंतच्या समुद्रातील भागात लक्ष ठेवण्याचे, सागरी पोलिसांनी स्वतः आपल्या जवळील चार स्पीडबोटींद्वारे पेट्रोलिंगला जावे, तसेच या बोटीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.