महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, पोलीस दलात खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – आडगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनिषा गोसावी (वय-35 रा. आयोध्या अपार्टमेंट, जेलरोड) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मनिषा गोसावी या आडगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

आज (रविवार) दुपारी पोलीस ठाण्याकडे येत असताना नांदूरनाका परिसरात त्या बेशुद्धवस्थेत नागरिकांना आढळून आल्या. नागरिकांनी त्यांना तात्काळ उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शहराच्या दौऱ्यावर प्रथमच येत असताना ही घटना घडल्याने याचे गांभीर्य वाढले असून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

पोलीस शिपाई मनिषा गोसावी यांचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आडगाव पोलीस ठाण्याच्या वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, शवविच्छेनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

वरिष्ठ पोलीस निरिक्षकांविरुद्ध तक्रार दिली होती
महिला पोलीस शिपाई मनिषा गोसावी या मागील 20 तारखेपासून रजेवर होत्या. त्यांनी आठवडाभरापूर्वी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरुद्ध तक्रारदेखील दिली होती. यामुळे सहायक पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर चौकशी अहवाल माझ्याकडे सोपविला आहे. त्यानुसार खुलासे घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/