अरे देवा ! शिकार करताना हत्तीच्या पायाखाली येऊन प्राण गमावला

ता. २१, पोलिसनामा ऑनलाइन : क्रूगर नॅशनल पार्क येथे शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या सर्वात मोठ्या अभयारण्यांपैकी हे एक अभयारण्य आहे. इथे गेंड्याच्या शिकारीसाठी आलेल्या तीन लोकांपैकी एकाचा हत्तीच्या पायाखाली येऊन मृत्यू झाला.. गेंडे, हत्ती, सिंह, बिबटे आणि म्हशीसाठी क्रूगर नॅशनलपार्क हे प्रसिद्ध आहे. या नॅशनल पार्काच्या फाबेनी भागात शनिवारी वनसंरक्षकांना तीन लोक दिसून आले होते. ते गेंड्यांच्या शिकारीसाठी आल्याचा त्यांना संशय होता. वनसंरक्षकांच्या नजरेत पडल्यावर तिघांनीही तिथून पळ काढला. ते लपण्यासाठी हत्तींच्या कळपात शिरले. त्यात मोठे हत्ती आणि पिल्लंही होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

तीन लोकांपैकी एकाला नंतर वनरक्षकांनी अटक केली होती. आपला एक साथीदार मरण पावला असल्याची शक्यता त्याने पोलिसांकडे वर्तवली होती. त्यानंतर वनसंरक्षकांनी त्याच्यासह ते तिघे ज्या मार्गावरून गेले होते, त्या मार्गावर पुन्हा फिरून शोध घेतला. त्या वेळी, हत्तींनी पायदळी तुडवल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीला मृतदेह सापडला. दरम्यान, एक जण या वेळी पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे. शिकाऱ्याकडून एक रायफल, कुऱ्हाडी ठेवलेली एक बॅग आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यावरून ते गेंड्यांची शिकार करण्यास आल्याचं स्पष्ट होतं.

‘ नॅशनल पार्कमध्ये घडलेला मृत्यू दुर्दैवी आहे; मात्र क्रूगर नॅशनल पार्कमधल्या गेंड्यांची शिकार केवळ टीमवर्क आणि शिस्तबद्धतेतूनच थांबवता येऊ शकते. शिकारीमुळे, तस्करीमुळे कुटुंबं उद्ध्वस्त होतात. तसंच ज्या साधनसंपत्तीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि विकास होऊ शकतो, तेच दावणीला बांधले जातात,’ असं क्रूगर नॅशनल पार्कचे व्यवस्थापकीय अधिकारी गॅरेथ कोलमन यांनी निवेदनात म्हटलं आहे.