‘या’ कारणावरून श्रीगोंदा तालुक्यात सचिवाचे तडकाफडकी निलंबन

श्रीगोंदा/अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा निबंधकांनी तीन महिन्यापूर्वी बदली केल्या नंतरही बदलीच्या ठिकाणी न जाता सेवा संस्थांचे काम पाहणाऱ्या सचिवास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. राजू आडागळे (Raju Adagale) असे निलंबित करण्यात आलेल्या सचिवाचे नाव असून आडागळे हे बदली झाल्यानंतर देखील मढेवडगाव खामकरवाडी येथील सेवा संस्थांचे काम पहात होते. महत्त्वाचे म्हणजे आडागळे यांच्या जागी नेमण्यात आलेल्या सचिवांकडेच अगोदरच तीन संस्थांचा कारभार असल्याने सहकार खात्यातील अनागोंदी कारभार समोर आला आहे.

यासंदर्भात सहायक निबंधक रावसाहेब खेडकर म्हणाले, आडागळे यांच्याकडे मढेवडगाव व खामकरवाडी सेवा संस्थांच्या सचिव पदाचा कारभार होता. त्यांची तीन महिन्यापूर्वी बदली होती. मात्र, ते बदलीच्या ठिकाणी हजर होण्याऐवजी याच संस्थांचा कारभार पहात होते. त्यांना वारंवार बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र ते त्याच जागी राहिल्याने कार्यालयीन आदेशाचा अवमान व कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी जिल्हास्तरीय समिती सदस्यांनी त्यांचे निलंबन केले.

निलंबित सचिव आडागळे यांच्याविरुद्ध रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊ मंडे यांनी सोमवारी आंदोलन केले होते. मढेवडगाव व खामकरवाडी सेवा संस्थेचा सचिव पदाचा पदभार संतोष पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. संतोष पवार यांच्याकडे अगोदरच विसापूर, कोरेगव्हाण व चांभूर्डी येथील संस्थांचा पदभार आहे. त्यातच त्यांच्याकडे आणखी दोन संस्था दिल्याने एक व्यक्ती पाच संस्था कशा सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.