Pune : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकरला ACB कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्पन्नापेक्षा अधिक मालमता बाळगल्याप्रकरणी अमरावती विभागाच्या नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर (वय-55 रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरुड) याला आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. नाझीरकरवर अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी एसीबीने दोन वर्षापूर्वी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बारामती पोलिसांकडून नाझीरकर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.30) ताब्यात घेतले.

मागील अनेक महिन्यापासून हनुमंत नाझीरकर हा पोलिसांना हुलकावणी देत होता. दहा दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी त्याला महाबळेश्वर येथे ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात बारामती पोलीस ठाण्यात फळविक्रेत्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात त्याला अटक केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मागील आठ दिवस हनुमंत नाझीरकर हा पोलीस कोठडीत होता. कोठडीत असताना त्याच्याकडून अनेक बोगस नोटरी मिळाल्या आहेत. गुन्ह्यातील सबळ पुरावा आम्हाला मिळाला आहे. त्याची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार नाझीरकरला ताब्यात घेतले आहे.

बारामती शहर पोलिसांकडून नाझीरकरला ताब्यात घेऊन सायंकाळी पुण्यात आणले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. एसीबीने केलेल्या चौकशीत हनुमंत नाझीरकर याच्याकडे उत्पन्नापेक्षा 2 कोटी 75 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली होती. त्यामुळे हनुमंत नाझीरकर, त्याची पत्नी संगीता मुलगी गीतांजली आणि मुलगा भास्कर यांच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करत असताना नाझीरकर याने आपल्या नातेवाईकांच्या नावावर देखील बरीच मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. ती सर्व मालमत्ता तब्बल 150 कोटींहून अधिक असल्याचा संशय आहे. ही मालमत्ता बेनामी असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची माहिती आयकर विभागाला दिली आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून देखील नाझीरकर याची चौकशी सुरु आहे.