माफियाची मैत्री भोवली ; ४ उपनिरीक्षकांसह ६ जणांचे तडकाफडकी निलंबन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य भारतातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया आबू खान याला दोन आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याला साथ देणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकांसह ६ जणांना नागपूर पोलीस आयुक्तांनी मंगळवारी निलंबित केले. या कारवाईने शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

हुडकेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश पुरभे, सक्करदऱ्यातील उपनिरीक्षक मनोज ओरके, तहसीलमधील शरद सिकने आणि साजीद मोवाल हे चार पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्रा अशा सहा जणांना निलंबित केले आहे.

आबू खान यांच्या दोन साथीदारांना यापूर्वी पकडून पोलिसांनी ३ लाखांचे एम डी पावडर जप्त केली होती. या दोघांच्या अटकेतूनच कुख्यात ड्रग्ज माफिया आबूच्या नेटवर्कची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर प्रथमच आबूला पकडण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले.

आबूच्या ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कला शहरातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे पाठबळ असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी आणखी खोलात जाऊन तपास केल्यावर  हुडकेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश पुरभे, सक्करदऱ्यातील उपनिरीक्षक मनोज ओरके, तहसीलमधील शरद सिकने आणि साजीद मोवाल हे चार पोलीस उपनिरीक्षक ड्रग्ज माफिया आबूच्या सतत संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर पोलीस दलात प्रचंड वादग्रस्त अशी ओळख असलेला पोलीस कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्रा या दोघांचे आबूच्या मोबाईलमध्ये वारंवार कॉल्स आढळले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीही हादरले. पोलीस दलात राहून, सरकारचा पगार घेऊन हे पोलीस अधिकारी-कर्मचारी आबूची चाकरी करीत असल्याचा अंदाज आल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी त्याची गंभीर दखल घेत नीलेश पुरभे, मनोज ओरके, शरद सिकने आणि साजीद मोवाल या चार पोलीस उपनिरीक्षकांच्या तसेच कर्मचारी जयंता शेलोट आणि श्याम मिश्राच्या निलंबनाचे आदेश रात्री जारी केले. त्यामुळे नागपूर पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.