धक्कादायक ! बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत ‘डांगडिंग’ करणारे 2 पोलिस तडकाफडकी निलंबीत

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपीसोबत खाकी वर्दीवर हॉटेलमध्ये राजरोस ओली पार्टी करणे बीड येथील दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. हा प्रकार समोर आल्यानंंतर पोलीस अधीक्षकांनी दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले आहे. या प्रकरणाची बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सहायक फौजदार नामदेव धनवडे आणि हवालदार सत्यवान गर्जे असे निलंबनाची कारवाई केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मूकबधिर मुलीसोबत अत्याचार करणाऱ्या तुकाराम कुडूक या आरोपीला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. आरोपीला न्यायालयात हजर करणारे 2 पोलिसच त्याच्या सोबत पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये चक्क दारू पीत बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा व अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक उमेश कस्तुरे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याचा अहवाल प्राप्त होताच गुरुवारी रात्री पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस अमलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.