सरकारी महिला वकिलाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जामनेर शहरात सरकारी महिला वकिलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विद्या भरत पाटील उर्फ राखी (37) असे या महिलेचे नाव असून ती जामनेर शहरात सुपारी बागेच्या मागे राहते. तिचे पती डॉ. भरत पाटील यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याने त्यानेच तिला मारले असा आरोप राखीच्या नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईक म्हणाले…

मिळालेल्या माहितीनुसार राखी भरत पाटील या जळगाव येथील कोर्टात सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांचे पती भरत लालसिंग पाटील हे डॉक्टर आहेत. त्यांचे जामनेर शहरात मोठे क्लिनिक देखील आहे. मात्र ते व्यवस्थित चालत नाही. म्हणून भरत पाटील हा पत्नीकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. गेल्या आठवड्यात राखी यांनी पत‍ीला 58 हजार रुपये दिले शिवाय त्याचे बाहेर दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध देखील होते असे नातेवाईकांनी सांगितले. दोघे जामनेर शहरातील सुपारी बागेच्या मागे एकत्र राहात असून त्यांना दोन अपत्य आहेत.

हे आहे हत्येचे कारण…

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार भरत पाटील यांनी सर्वांना पहाटे चार वाजता फोन करून राखीचा मृत्यू बाबद सांगितले. असे कसे झाले विचारले असता तिला करंट बसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पतीने राखीचा मृतदेह त्याचे मूळगाव बेलखेड येथे मृतदेह नेला. मात्र, पोस्ट मार्टम झाल्याशिवाय तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर मृतदेह वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. प्रकरण गंभीर असल्याने मृतदेह पुन्हा जळगाव येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला.