लोकसभेची उमेदवारी करणार नाही ; सुवेंद्र गांधी यांची घोषणा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे विरोधी पक्षनेते हे स्वतः दोन वेळेस आमच्या घरी येतात तसेच राज्याचे संघटनमंत्रीही येतात तेव्हा त्यांच्या विनंतीला मी मान देत आहे. म्हणूनच मी लोकसभेची उमेदवारी न करता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी जाहिर केले. यावेळी शहर भारतीय जनता पार्टीचे संघटनमंत्री संघटन सरचिटणीस किशोर श्रीकांत साठे आदींसह शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गांधी म्हणाले की, दोन दिवसापूर्वी पक्षाचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक व मंत्री राधाकृष्ण विखे हे घरी आले, पुन्हा विनंती केली. माझे वडील खा. दिलीप गांधी यांनीही पहिल्या दिवशी मला उमेदवारी न करण्याचे सूचना केल्या होत्या. मी माझ्या आई-वडिलांचा ऐकणारा मुलगा आहे, म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गांधी म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे अनेक पदांवर काम करता आले. वडील खा. दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व जिल्ह्यात पक्षाचे काम केले. मात्र, 1999 गांधींना जिल्हाध्यक्षपदासाठी डावलले, 1996 ला लोकसभेसाठी डावलले, 1999 ला मोठा संघर्ष केल्याने भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळाले व लोकसभेच्या निवडणुकीत दिलीप गांधी विजयी झाले. मात्र, परत 2004 ला लोकसभेचे तिकीट कापले. असा सतत्याने दिलीप गांधींवर पक्षाकडून अन्याय झाला असला तरी खा. दिलीप गांधी यांनी पक्षनिष्ठा कणभरही कमी केली नाही.

शहरात व जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष टिकवून पक्षाला सुवर्ण दिवस आणले. शहर जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षात सर्वात जास्त उपक्रम राबवले. मतदारसंघाच्या विकासासाठीही केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांच्या विकास निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला. पक्षाने सांगितले व दिलेले सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबविले. तरीही आताच्या लोकसभेसाठी खासदार गांधींचे तिकीट कापून अन्याय केला. असे असतानाही 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या मेळाव्यात मी भारतीय जनता पार्टीचे काम करणार व पक्षाचा उमेदवार विजयी करणार असे मेळाव्यात घोषणाही केली होती. तरीही भाजपचे उमेदवाराकडून वरिष्ठ खासदार म्हणून अद्याप उचित सन्मान मिळाला नाही. म्हणून मी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी करणार असे जाहीर केले होते.