#Loksabha : आता घरबसल्या भरा उमेदवारी अर्ज, निवडणूक आयोगाचे ‘सुविधा अॅप’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, सभेचे बुकिंग करण्यासाठी सगळ्याच पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. सध्याच्या ऑनलाइन प्रचार आणि सोशल मीडियाच्या काळात निवडणूक आयोग देखील हायटेक झाले आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी एक मोबाइल अॅप आणलं आहे. यामध्ये फक्त एक बटण दाबून उमेदवारी अर्ज भरणं, वाहनांची मंजुरी मिळवणं, सभांची परवानगी, निवडणूक चिन्हं मिळवणं ही सगळी कामं करता येणार आहेत.

निवडणूकीच्या तारखा जवळ आल्या आहेत मात्र, काही पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. अशा स्थितीमध्ये ऐनवेळेला अर्ज भरावे लागणार आहेत. सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. निवडणूक तारखा जसजशा जवळ येथील तशी धांदल आणखी वाढणार आहे.

‘सुविधा’ या मोबाइल अॅपवर तुम्हाला फक्त याच सुविधा मिळणार नाहीत तर निवडणूक निकालांची बित्तंबातमीही मिळणार आहे. हे मोबाइल अॅप निवडणूक आयोगानेच तयार केल्यामुळे अधिकृतही आहे. उमेदवार, त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांसाठी हे चांगलं अॅप आहे. यामुळे कुणी कुठे सभा घ्यायच्या हा संघर्षही कमी होईल. सभेची परवानगी ऑनलाइन मिळवता येईल. त्यामुळे निवडणूक अधिकारी कुणा एका उमेदवाराला झुकतं माप देतात, असे आरोपही होणार नाहीत. या अॅपवर नोंदणी केली की सभेची तारीख आणि वेळ डिसप्ले होईल. हे बुकिंग फर्स्ट कम फर्स्ट या तत्त्वाने होणार आहे.

‘सुविधा’ अॅपमध्ये उमेदवाराला अर्ज भरण्यासोबतच आणखीही ऑनलाईन आणि ऑफलाईन पर्याय आहेत. सगळी कागदपत्रं स्कॅन करून मग त्याची मूलभूत प्रत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जमा करायची आहे. या कागदपत्रांची पडताळणी झाल्याची माहिती उमेदवारांना या अॅपवर मिळू शकते.