स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पेटवले कृष्णा साखर कारखान्याचे कार्यालय

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा  या भागात उसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. ऊसाला एक रकमी एफआरपी ऐवजी २३०० रुपये पहिली उचल दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील कृष्णा साखर कारखान्याचे नोंदणी कार्यालय पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शेतकरी संघटना आक्रमक
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याकडून एक रकमी एफआरपी ऐवजी २३०० रुपये पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. यामुळे स्वाभिमानाने याविरोधात पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. यंदाच्या ऊस हंगामात एफआरपीसाठी झालेल्या आंदोलनानंतर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी अधिक २०० रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, आता कारखानदारांकडून साखरेला भाव नसल्याने एक रकमी एफआरपी देने परवडत नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यानंतर कारखान्याने तब्बल 2 महिन्यानंतर शुक्रवारी शेतकऱ्यांच्या ऊसाची पाहिली उचल म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर २३०० रुपये जमा केले आहेत. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
एफआरपीच्या मागणीसाठी ऊस आंदोलन 
दरम्यान, साखर कारखान्याच्या विरोधात पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडले आहे. एक रकमी एफआरपी मिळावा या मागणीसाठी वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथील  कराडच्या कृष्णा साखर कारखान्याच्या गेटकेन कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालयातील साहित्यांची नासधूस करत पेटवून दिले आहे. यामध्ये कार्यालयातही कागदपत्रे जाळून खाक झाली आहेत. एक रकमीच एफआरपी मिळाली पाहिजे, अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. तर आता पुन्हा एफआरपीच्या मागणीसाठी आंदोलन पेटणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणूक : सपा-बसपा आघाडी झाली जाहीर ; पहा जागावाटप