सांगलीतील तिढा सुटला; आघाडीची जागा स्वाभिमानीच्या पारड्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाआघाडीची पहिली प्रचारसभा पार पडली तरीही संगलीची जागा कोण लढणार यावर एकमत झाले नव्हते. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या शेजारी असलेल्या हातकणंगले मतदारसंघाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. या ठिकाणी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. सांगलीची जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली असून लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

गेल्या रविवारी महाआघाडीची कराडमध्ये पहिली प्रचारसभा झाली. या सभेला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या पूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतील जागा वाटपातील त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येकी दोन जागा मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्वाभिमानी संघटनेला दोन जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक हातकणंगलेची होती. तर दुसरी जागा सांगलीची मागितली होती.

अखेर आज यावर शिक्कामोर्तब झाले असून शेट्टी यांनी लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले. तसेच वेळ पडल्यास आपल्या पक्षाच्या चिन्हावर काँग्रेसच्या नेत्याला उमेदवारी देण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे.