स्वाभिमानी शेतकरी संघटना बनली आक्रमक; ऊसाच्या FRP वादात सांगलीत साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली येथील पलूस तालुक्यातील घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana ) कार्यकर्त्यांनी पेटवले. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana ) आक्रमक बनली आहे. वेळेत एफ आर पी न दिल्याच्या निषेधार्थ घोगाव येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले. हा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा घडला आहे. आगीमध्ये कार्यालयातील कागदपत्रे व फर्निचर जळाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफआरपी मिळावी असा आग्रह धरला होता. यासाठी सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनेही झाली. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केल्यानंतर हंगामाला सुरुवात झाली. मात्र, हंगाम सुरू होऊन अडीच-तीन महिने उलटले तरी, अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांना इशारा दिला होता. यानंतरही अपवाद वगळता इतर कारखान्यांनी एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही. वेळेत एफआरपी मिळत नसल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

एकरकमी एफआर पी वरून, पदवीधर निवडणुकीपूर्वी कारखान्याचे चेअरमन अरुण लाड यांनी एकरकमी एफ आर पी द्यायचे कबूल केले होते, मात्र निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी शब्द पाळला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही, यामुळे यानंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.