भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात दुपटीने वाढ ; पहिली स्वदेशी ‘तोफ’ लष्करात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराचे सामर्थ्य अधिक वाढले आहे. आण्विक पाणबुडी तसेच शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्सनंतर आता ‘धनुष’ तोफ लष्करात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ‘धनुष’ ही भारतीय लष्कराची पहिली स्वदेशी बोफोर्स तोफ आहे. ही तोफ जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या भारतीय सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

आज होणाऱ्या कार्यक्रमात लष्कराकडे ६ तोफा सुपूर्द करण्यात आल्या. २०२३ पर्यंत भारतीय लष्कराच्या ताफ्यात ११४ धनुष तोफांचा समावेश होणार आहे. धनुषच्या समावेशाने भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात दुपटीने वाढ झाली आहे. या तोफेची चाचणी लेह, सिक्कीम अशा अतिथंड प्रदेशांमध्ये, ओडिशामधील बालासोर, झाशीमधील बबिना, राजस्थानमधील पोखरणसारख्या वाळवंटी प्रदेशात करण्यात आली आहे.

तोफेची वैशिष्ट्ये –

भाजप सरकारच्या काळात ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत ‘धनुष’ तोफेची निर्मिती करण्यात आली. या तोफेचे ९० % भाग भारतात बनलेले आहेत.

सर्व प्रकारच्या भूभागामध्ये या तोफेचा वापर होऊ शकतो. डोंगराळ आणि रेती असणाऱ्या भागात या तोफेचा सहजरित्या वापर केला जाऊ शकतो. या तोफेतील बॅरेलचे वजन २ हजार ६९२ इतकं आहे. तोफेत लागणाऱ्या गोळ्याचे वजन ४६. ५ किलो आहे. ३८ किलोमीटर अंतरापर्यंत ही तोफ मारा करू शकते.

सलग २ तास मारा करण्याची क्षमता असणारी ही तोफ एका मिनिटात २ वेळा मारा करु शकते. (३० सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार)

पर्वतीय प्रदेशात तोफेचा वापर सुरळीतरीत्या व्हावा, यासाठी तोफ ‘सेल्फ प्रॉपल्शन युनिट’ने सज्ज आहे. तोफेचा मारा अधिक अचूक व्हावा, यासाठी तोफ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे. यामध्ये कॉम्प्युटर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे ही तोफ स्वत:चा दारूगोळा तोफेत घेऊन फायर करु शकणार आहे. या तोफेमधून विविध प्रकारचा दारुगोळा डागता येणार आहे.

You might also like